गंगापुरात दुष्काळाचे सावट, तरीही पोळ्याचा उत्साह कायम

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यावर यंदा दुष्काळाचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलजोडीप्रती कृतज्ञता व्यक्त करत पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. तालुक्यातील गावागावांत बळीराजाने आपल्या बैलांची सजावट करून विधिवत पूजन केले.

पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी सकाळपासूनच बैलांना स्वच्छ धुऊन आंघोळ घातली. त्यांच्या शिंगांना रंग देण्यात आला. अंगावर आकर्षक झूल चढविण्यात आली. गळ्यात घुंगरांच्या माळा व फुलांचे हार घालून बैलजोडी सजविण्यात आली. सजविलेल्या बैलजोडीचे औक्षण करून हळदी कुंकू, अक्षता, फुले व नैवेद्य अर्पण करत शेतकऱ्यांनी पूजन केले. ग्रामीण संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. 

त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांनी पोळ्याची परंपरा जपली. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला. शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पोळ्याच्या दिवशी बळीराजाने आपल्या बैलजोडीचे पूजन करताना चांगला पाऊस पडावा, शेतीला बहर यावा आणि शेतकरी सुखी व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना केली. 

तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैलजोडी सजविण्याची लगबग, पूजन आणि मिरवणुकीमुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांसह महिला व ग्रामस्थांनीही पोळा सणात सहभाग घेतला. दुष्काळाच्या छायेतही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि बैलांप्रती असलेली कृतज्ञता या सणातून प्रकर्षाने जाणवली.